Friday, December 24, 2010

दिवाळी



आली माझ्या घरी हि दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली
आली माझ्या घरी हि दिवाळी

ह्या वर्षी दिवाळी नक्कीच माझ्या घरी आली. हो, कारण मीच दिवाळीसाठी भारतात जाणं प्लान केलं. तब्बल सहा वर्षानंतर प्रथमच दिवाळीत मी मुंबईला, माझ्या घरी होतो. ह्या वर्षीच्या दिवाळीच्या माझ्या काही आठवणी इथे मांडणार आहे!

सर्वप्रथम जाणवलं कि हल्ली दिवाळीत मुंबईत भयंकर उकाडा असतो, विशेष करून जर तुम्ही अमेरिकेतून आला असाल तर मग तो अधिकच जाणवतो. इथे १५-२० वर्षे राहिलेल्या कुणालाही विचारा तो सांगेल कि पूर्वी मुंबईत दिवाळीत हवेत गारवा असायचा ते. ग्लोबल वॉर्मिंग खरं असावं बहुतेक . त्यात भर म्हणजे अनियमित पाऊस. पण पाऊस मात्र एन्जॉय केला. इथे अमेरिकेतही पाऊस पडतोच पण मॉन्सून ची मजा काही औरच!

दिवाळीस आठवड्याचा अवधी असेल आणि बाजारात फटाके दिसू लागले. त्यातच आकाशकंदील, मातीच्या पणत्या, रांगोळी, ह्या आणि अशा विविध गोष्टींनी रस्ते फुलून गेले. शाळेलाही सुट्ट्या लागल्या आणि गल्लोगल्ली क्रिकेट सुरु झाले. आमच्या लहानपणी शाळेत दिवाळीचा homework म्हणून आम्ही एक वही बनवायचो. त्या वहीत फटाक्यांच्या box ची कात्रणं, कागदाच्या नक्ष्या, अशा अनेक गोष्टी असायच्या, अजूनही आठवतंय आम्ही चमचमत्या gelatin पेपर्सचे कवर घालायचो त्या वहीला. काय माहित, आजकाल शाळेत मुलांना असं असतं का ते. मी दिवाळीच्या सुट्टीत बनवलेला पुठ्याचा tv आणि giraffe अजूनही आठवतोय.
४-५ दिवस राहिले तेव्हा आईनेही फराळ करायला घेतला. मीही तिला चकल्या बनवायला मदत केली. चकल्या, चिवडा, आणि शंकरपाळ्या हे माझे आवडीचे पदार्थ! करंज्या, बेसनाचे लाडू ह्या गोष्टी preference लिस्ट मध्ये फार शेवटी.

दिवाळीच्या आदल्या दिवशी वडिलांनी कंदील लावले. मीपण light स्ट्रिंग ची एक मोठी पणती बाल्कनीच्या ग्रील वर बसवली. ऐन दिवाळीच्या दिवशी पहाटे ५ लाच सुतळीबाराच्या आवाजाने जाग आली. दिवाळीला घरी,मुंबईत असण्याचा एक मस्त feel आला. आईने अंगावर सुगंधित उटणे लावले आणि दिवाळीचे अभ्यंगस्नान घेतले. आमच्या घरी कारेटे आणून ते अभ्यंगस्नानानंतर ते फोडण्याची प्रथा आहे, तसे ते पायाच्या अंगठ्याने फोडले, त्यातली एक बी कपाळाला लावून दुसरी बी जिभेवर ठेवली, तोंड फारच कडू झाले! नंतर दिवाळीच्या फराळावर ताव मारला. अगोदरसारखे फटाके ह्या खेपेस फोडले नाहीत, पण तरीही पाऊस, भुईचक्र (आम्ही ह्याला bhingaraya म्हणतो) बघताना मजा आली. भाऊबिजेला बहिणीकडे वडे (कोंबडीवडे)- मटणाचा बेत होता, बहिणीकडून ओवाळून घेताना फार छान वाटलं. माझ्या भाचीलाही हे सर्व बघून मला ओवाळावस वाटलं. मग काय double भाऊबीज झाली. माझी अमेरिकेतली बहिण इथे नव्हती, म्हणूनच कि काय भाची कडूनपण ओवाळणी झाली.


लहानपणी आमच्या शेजारच्या मुलीला आम्ही सांगायचो कि दिवाळी आता स्टेशन पर्यंत आलीये, मग नाक्या पर्यंत, बाजूच्या दुकानापर्यंत आणि शेवटी घरी येते. अशी हि दिवाळी आली आणि फटाक्यांच्या आवाजात, फराळ कडम कडम करत खाण्यात आली तशी निघून गेली.

1 comment: