Friday, July 9, 2010

पाउस आणि मुम्बई ची आठवण

आज पुन्हा माज्या शहरामधे आभाळ दाटून आल, पुन्हा पाउस पडला .केंटकी मधले ढग तितके काळे नव्हते, पावसाची रिपरिप चालू होती, अधूनमधून सरि पडत होत्या .
पावसाचे थेम्ब नेहमीच मुंबई ची आठवण जागी करतात. तिथल्या मुसळधार सरी, वाऱ्याने उलटणाऱ्या छत्र्या , कोपऱ्यावरची कटिंग चाय ( पुणेकरांसाठी तो कटिंग चहा ), कांदा भजी सर्वं काही मिस केलं. ह्या सगळ्या गोष्टी इथे मिळतील का ? का नाही , एकच गोष्टं नाहीये ती म्हणजे आपली माणसं आणि आपली मुंबई !

मुंबईत लोकांची पावसात एकच धांदल उडायची . वाळायला घातलेले कपडे धावत जाऊन घेऊन यायचं, गमबूट आणि रेनकोट चढवायचं, खाडखाड छत्र्या उघडायच्या , भाजी आणि फळ वाले आपापल्या वस्तू झाकायचे . पण सर्वात जास्त धांदल उडायची ती बिन छत्र्या आणि बिन रेनकोट वाल्यांची , जी काय धावाधाव उडायची कि ह्यातल्या काहींना भारतातर्फे ऑलिम्पिक साठी पाठवले तर मेडल घेऊन येतील असं वाटायचं .बहुतेकांना मातीचा सुगंध आवडतो आणि ते साहजिकच आहे, पण मला तर डांबरी रस्त्यावर पडलेल्या पेट्रोल चा वास आणि त्यात दिसणारं ते इंद्रधनुष्य हि फार फार आवडायचं. जर पाऊस सतत पडत राहिला तर मात्र लोकांची गोची व्हायची. करणार तरी काय, ट्रेन बंद बसेस बंद तरीही मुंबईकर रोजी रोटीसाठी साचलेल्या पाण्यातून आपलीवाट शोधत फिरत राहायचा. आम्हा चिमुकल्यांना साचलेलं पाणी म्हणजे एस्सेल world पेक्षाही जास्त फन वाटायचं, त्यात दोस्तांसोबत खेळताना केव्हढी मजा यायची .पाऊस आवडायचा तितकाच जेरीस पण आणायचा, मग कधी कधी वाटायचं नको तो पाऊस, नको तो चिखल, नको ते कपडे भिजणे, आणि नको ते सगळ्या गोष्टींना लेट पोहोचणे. इथे तो चिखल नाही, तो चिखल मी मिस करतोय .

half pant मध्ये खिडकीवर बसून हि सगळी मज्जा तासान तास बघत राहणारा चिमुकला विकास आज परत डोळ्यासमोर येतोय.